वेळोशी गावचे सुपुत्र श्री. प्रणित प्रतिभा संजय कांबळे यांची पीएसआय पदी निवड.
वेळोशी गावचे सुपुत्र श्री. प्रणित प्रतिभा संजय कांबळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम पी एस सी) तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी (पीएसआय) निवड.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेणाऱ्या प्रणितने असामान्य जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अवघड व खडतर वाटणारा मार्ग निवडला. फलटण तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या वेळोशी गावच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेणारा प्रणित पोलीस उपनिरीक्षक होतो ही एक आख्यायिकाच म्हणावी लागेल. वेळोशी गावातील पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण होणारा प्रणित हा सबंध गावातील पहिलाच तरुण होय. उपळवे येथे माध्यमिक शिक्षण व त्यानंतर मुधोजी ज्युनियर कॉलेज येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्याने इंजिनिअरिंगचा मार्ग निवडला. अचाट बुद्धिमत्ता असून देखील परिस्थिती पुढे कुटुंबाने हात टेकले आणि प्रणितला अभियांत्रिकीचे शिक्षण अर्ध्यावर सोडून गावाला माघारी यावे लागले. भरपूर पैसे वाया गेले होते. या परिस्थितीजन्य अपयशास पचवून त्याने मुधोजी महाविद्यालय फलटण येथे प्रवेश घेतला. आता तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जायचे म्हटले तरी पैशाची चणचण भासणार होती. सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणात मदत करणारी सर्वोत्कृष्ट सरकारी योजनांपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह! तेथून राज्यशास्त्र विषयाची बीएची पदवी मिळवली.
यानंतर सुरू झाला खडतर प्रवास. पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा या हेतूने प्रणितने पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. प्रवेश मिळण्याची अवघड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू झाली ती राहण्याच्या जागेची शोधाशोध! मित्राच्या हॉस्टेलवर गॅलरीमध्ये झोपून कशीतरी रात्र काढायची आणि सकाळी लवकर उठून लायब्ररी गाठायची. अशाप्रकारे लॉकडाऊन चा काळ वगळता सलग पाच वर्ष जिद्दीने अभ्यास करून येणाऱ्या सर्व परीक्षा द्यायला सुरुवात केली. घरून येणारी तुटपुंजी आर्थिक मदत, पुण्यात येणारा भरमसाठ राहण्याचा व पुस्तकांचा खर्च, दोन-तीन मार्कांनी हुकलेले चान्सेस या सर्वांमधून मार्ग काढत प्रणित चा अविरत संघर्ष सुरूच होता. सर्व परीक्षांचे निकाल नकारात्मक येत असताना सेट आणि नेट या परीक्षांचे निकाल मात्र प्रणित च्या बाजूने लागले. 2021 साली झालेली कम्बाईन एक्झाम ची पूर्व परीक्षा पास होण्यापूर्वीच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू केली होती. ही सलग दुसरी मुख्य परीक्षा होती. यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये अपयश आले होते. तो अपयशाचा डाग धुऊन काढायचा होता. मग प्रणित ने अशी काही मुख्य परीक्षेची तयारी केली की मेरिटपेक्षा 34 मार्क जास्त मिळवले. आता मुलाखत म्हणजे केवळ एक औपचारिकता बाकी होती. कारण चांगल्यात चांगली मुलाखत 40 पैकी 25 मार्क मिळवून देते आणि कितीही वाईट मुलाखत गेली तरी 15 पेक्षा कमी मिळत नाहीत. मुख्य परीक्षेचे निकाल आल्याक्षणी प्रणित पी एस आय होणार हे जणू जाहीर झाले होते. मुलाखतीमध्येही मुख्य परीक्षा प्रमाणेच खणखणीत मार्क मिळवून प्रणित चे नाव पहिल्याच यादीत झळकले.
फक्त प्रणितच्या घरातच नाही किंवा समाजातच नाही तर संपूर्ण गावात एकानेही या परीक्षेमध्ये यश मिळवले नाही. त्यामुळे प्रणित चे यश अभूतपूर्व आहे. जिथे अभ्यास केला ती लायब्ररी, वाचनालय, बुद्ध विहार, अनिकेत कॅन्टीन चे प्रांगण, मुख्य इमारतीचा बगीचा अशा सर्व ठिकाणी सत्कार स्वीकारल्यानंतर त्याचे गावात आगमन झाले. भव्य मिरवणूक - बॅनर - गुलालाची उधळण - डीजेचा निनाद अशा स्वरूपात वेळोशी गावाने प्रणितचे यश साजरे केले. प्रणित च्या भाऊबंदांनी सर्व गावकरी व पै पाहुणे यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन केले.
प्रणित चे बंधू आयु. प्रशांत प्रतिभा संजय कांबळे यांनी जमलेल्या स्पर्धा परीक्षा इच्छुक उमेदवारांना प्रणित दादाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना स्वतःमध्ये दादा सारखेच संविधानवाद, पर्यावरणवाद, स्त्रीवाद, समाजवाद यांसारखे विचार अंगी बाणावेत. भविष्यात येणाऱ्या काळात दादा कडून समाजोपयोगी कामे घडावीत अशी मनोकामना व्यक्त केली.
प्रणित या यशाचे संपूर्ण श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या शिक्षणाच्या चळवळीला देतो. बुद्ध, कबीर, शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जिजामाता, साऊ, माता रमाई, राजमाता अहिल्या, मुक्ता साळवे यांचा आदर्श कायमच आपल्याला प्रेरणा देत राहील. समता सप्ताहात सदर नियुक्तीची बातमी येण्यामुळे आपणास या समाजसुधारकांचा व त्यांच्या कार्य-विचारांचा कधीही विसर पडणार नाही तसेच प्रामाणिकपणे आपल्या हातून भारत देशाची सेवा घडेल, या शब्दांनी प्रणितने सत्कारास जमलेल्या मंडळींना आश्वासित केले. याप्रसंगी आपली आजी कालवश उल्हासाबाई आपल्या पाठीमागे शेवटच्या श्वासापर्यंत उभी राहिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास तो विसरला नाही.
आंबेडकर जयंती उत्सव मंडळ फलटण व राहुल मित्र मंडळ तरडगाव यांसारख्या अनेक छोट्या मोठ्या मंडळांनी येत्या काळात त्याचे सत्कार नियोजित केले आहेत. येणारे काही दिवस हे शुभेच्छा स्वीकारण्यात जातील. प्रणित च्या म्हणण्यानुसार या निकालानंतरच्या दोन दिवसात दहा वर्षाची मेहनत सफल झाल्याचे भाव उमटत आहेत.
प्रणित चे शिक्षक, मित्र परिवार, नातेवाईक, गावचे सरपंच व सर्व सदस्य पै पाहुणे या सर्वांनी भरभरून कौतुक केले.
बातमी लेखन : प्रा. श्रेयस भीमराव कांबळे
Post a Comment