प्रा.रमेश आढाव यांना फलटण पूर्व भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रा.रमेश आढाव यांना फलटण पूर्व भागात उत्स्फूर्त प्रतिसाद |
फलटण :
फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचाराला फलटण पूर्व भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी प्रचारादरम्यान गावभेट दौर्यावर जोर दिला असून हाऊस टू हाऊस प्रचाराबरोबरच शेतकर्यांच्या बांधावर जावून ते आपला प्रचार करताना दिसत आहे. प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना, ‘‘आज शेतकरीवर्ग अडचणीत आहे. समाजा - समाजात जातीय तेढ निर्माण झालेले आहेत. युवकांच्या हाताला रोजगार पाहिजे. खेड्यापाड्यातील गरजूंना शिक्षण, आरोग्य सुविधा दर्जेदार उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी मतदारांनी या निवडणूकीत वेगळा पर्याय निवडणे आवश्यक असून आपल्याला भरघोस मतांनी विजयी करावे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यात आपण नक्की यशस्वी होवू’’, असे अभिवचन प्रा.रमेश आढाव देत आहेत.
प्रचारादरम्यान स्वाभिमानीचे व संविधान समर्थन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही प्रा.रमेश आढाव यांचा वचननामा मतदारांना पटवून देण्याबरोबरच, ‘‘गत 30 ते 35 वर्षांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रा.रमेश आढाव यांना तालुक्यातील प्रश्नांची चांगली जाण आहे. जे प्रश्न राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सुटलेले नाही ते प्रश्न आढाव सरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवलेले आहेत व यापुढे सुद्धा फलटणकर जनतेने प्रा.आढाव यांना राज्याच्या विधिमंडळात पाठवल्यानंतर तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय ते शांत राहणार नाहीत’’, असे ठाम मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान, प्रा.रमेश आढाव हे मुळचे फलटण तालुक्यातील पूर्व भागातील गुणवरे गावचे असल्याने या भागातील लोकांकडून ठिकठिकाणी त्यांचे औक्षण, सत्कार करुन त्यांना आशिर्वाद व शुभेच्छा देतानाचे चित्र पहायला मिळत आहे.
Post a Comment