कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रमुख वैद्यकीय अधिकारी, धर्मादाय रुग्णालयाचे प्रमुख यांच्यासोबत एन.डी.एम. जे संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.- वैभव गिते

ठाणे : (कल्याण डोंबवली)
सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत व सवलतीच्या दरात दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी दवाखान्यांचे वैद्यकीय अधिकारी व धर्मादाय रुग्णालयांचे प्रमुख तसेच नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्याचे सचिव वैभवजी गीते यांची संयुक्त बैठक दिनांक 4/8/2025 रोजी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांच्या कक्षामध्ये संपन्न झाली. यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी ऊके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभवजी गिते यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये प्राधान्याने मोफत व दर्जेदार उपचार मिळण्यासाठी एकूण 19 मुद्द्यांवर चर्चा केली. शासनाचे विविध कायदे,शासन निर्णय व परिपत्रकांची माहिती देत वैभव गिते यांनी कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकाच्या सोबत भेदभाव केला जाणार नाही याची दक्षता धर्मादाय रुग्णालयांनी घ्यावी. रुग्णास उपचार देण्यास व ऍडमिट करून घेण्यास टाळाटाळ करू नये, कोणतेही प्रकारची अनामत रक्कम स्वीकारू नये, योजनेअंतर्गत रुग्णांना औषधोपचार देखील मोफत देण्यात यावेत अशी मागणी केली अन्यथा धर्मादाय रुग्णालयांच्या समोर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.उपस्थित धर्मादाय रुग्णालयांच्या प्रमुखांनी रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांनी बाई रुक्मिणी हॉस्पिटल कल्याण व शास्त्रीनगर डोंबिवली या सरकारी दवाखान्यांमध्ये असणाऱ्या सोयीसुविधा याबाबत माहिती दिली. वैभव गिते यांनी बाई रूक्मिणी हॉस्पिटल कल्याण येथे असलेल्या एम.आर.आय स्कॅन, सिटीस्कॅन व इतर सुविधा सर्व रूग्णांना मोफत देण्याची मागणी केली.
प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांनी सर्व धर्मादाय रुग्णालय प्रमुखांना व वैद्यकीय अधिकारी यांना मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार,शासन निर्णय व परिपत्रकांनुसार तसेच जिल्हाधिकारी,सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशांनुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना मोफत उपचार मिळण्यासाठी संघटनेच्या सोबत संयुक्त बैठक घेण्यासाठी राज्य सचिव वैभव गीते यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री .गुजर, गटविकास अधिकारी संजय भोये यांची भेट घेऊन निवेदन दाखल केले होते. याची गंभीर दखल घेत आयुक्त अभिनव गोयल व गटविकास अधिकारी संजय भोये यांनी तात्काळ बैठक आयोजित करून अहवाल महानगरपालिकेचे आयुक्त व उपविभागीय अधिकारी श्री गुजर यांना पाठवण्यात यावा असे पत्र प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांना काढले होते. त्याअनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे शासन निर्णय,धर्मादाय आयुक्तांनी काढलेले परिपत्रके याबाबत सखोल चर्चा झाल्याने ही महत्वपूर्ण बैठक घेऊन आयुक्त अभिनव गोयल व प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांनी महत्त्वाचे पाऊल पुढे टाकलेले आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांच्या सोबतच धर्मादाय रुग्णालयांमध्ये देखील मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे.यावेळी शशी भाऊ खंडागळे,राहुल सावंत, भाऊराव तायडे यांनी देखील सर्वांना मोफत व दर्जेदार उपचार मिळण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्याची मागणी केली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल व
प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांच्या पुढाकाराने
ही बैठक घेण्यात आल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.