* अजितदादांची ‘चाणक्य नजर’ * साताऱ्यातील शासकीय विश्राम गृहातील फुटलेल्या फरशीवरून जिल्ह्यात चर्चा……..

सातारा दि. ३ ऑक्टोबर –
राजकारणातील स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनाकडे चाणक्य नजरेने पाहण्याची ख्याती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शुक्रवारी सकाळी अचानक सातारा शासकीय विश्रामगृहात आले. वर्षभरापूर्वी विस्तारीकरण झालेले हे विश्रामगृह नेहमीप्रमाणे चार मंत्र्यांच्या सातारा दौऱ्यामुळे गजबजलेले होते. मात्र, जाताना अजितदादांच्या काळ्या काचेच्या गॉगलमधूनही फुटलेली फरशी सुटली नाही.
विश्रामगृहाच्या पायरीजवळील फुटलेल्या फरशीकडे त्यांनी थेट बोट दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांना नवल वाटले. “अजितदादांच्या नजरेतून काहीही सुटत नाही” अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
सातारा जिल्ह्याला सध्या चार मंत्री मिळाल्यामुळे (पालकमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले) विकासकामांना वेग आला असला, तरी शासकीय विश्रामगृहातील पावसाळ्यातच बिघडलेली अवस्था अजितदादांच्या बारकाईच्या नजरेतून सुटली नाही.
आता ही फुटलेली फरशी नव्याने बसवली जाणार यात शंका नाही, मात्र अजितदादांनी प्रशासनाला दिलेला हा ‘कडक इशारा’ जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.