* जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार * “निरगुडी ग्रामस्थांचा जनआक्रोश “

फलटण | निरगुडी गावातील प्रलंबित प्रश्नांवर गावपुढाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर गावातील नागरिक बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.
गावात वर्षानुवर्षे विविध मागण्या प्रलंबित आहेत. होलार समाजाला आजही हक्काचा रस्ता नाही, दलित वस्तीला २०१७ पासून संरक्षण भिंतीची मागणी असून जुलै २०२४ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर झाले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. कापसे वस्ती ते निरगुडी रस्ता दयनीय अवस्थेत असून बौद्ध वस्तीतील नागरिक सुद्धा रस्त्यापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे लोंढे वस्तीतील नागरिक पुलासाठी अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत, पण आश्वासनापलीकडे काहीच झालेले नाही. तसेच धनगर व मातंग समाजाची समाजमंदिराची मागणी अद्याप अपूर्णच आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात विकासकामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे म्हणाले, “गावामध्ये श्रेयवाद, आडवा-आडवी, जीरवा-जीरवी आणि काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळेच पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत गावपुढाऱ्यांची उदासीनता स्पष्ट दिसते.”
दरम्यान, माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत सोनवणे ,निलेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणून निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
” गावकऱ्यांच्या या संतप्त भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत मोठे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “