* भारत देशाला आज भगतसिंगांच्या विचाराची गरज- प्रा.डॉ.प्रभाकर पवार……….!

फलटण :
शहीद भगतसिंग एक क्रांतिकारी विचारांचे स्वातंत्र्य सैनिक होते. देशाला मुक्त करण्यासाठी ते अहोरात्र झटले.त्यांचा राष्ट्रीय व सामाजिक विचार समाजसुधारणा व स्वातंत्र्यवादी होता.स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आज स्वतंत्र भारत देशातील प्रश्न वेगळे आहेत.ते प्रश्न सोडवून एक संध भारताला विज्ञानवादी, पुरोगामी व राष्ट्रवादी राष्ट्र बनविण्यासाठी शहीद भगतसिंग यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी इतिहासाभ्यासक डॉ.अनिल टिके होते तर प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली कांबळे व प्रा.फिरोज शेख होते.
मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंती’,कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले,भगतसिंग विसाव्या शतकातील महान भारतीय क्रांतिकारक एक आदर्श व लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्वातंत्र्यवादी,पुरोगामी व विज्ञानवादी विचारांनी भारतीय समाजसुधारणा व स्वातंत्र्य चळवळीला खूप मोठी प्रेरणा मिळाली त्यांनी देशासाठी सशस्त्र लढा तर दिलाच पण अत्यंत लहान वयात त्यांनी ‘नौजवान भारत सभा’, ‘कीर्ती किसान पार्टी’, ‘हिंदुस्तान सोशालिस्ट’ व ‘रिपब्लिकन असोसिएशन’ यासारख्या आधुनिक व परिवर्तनवादी विचारांच्या संघटना काढल्या त्या युवकांच्यात अतिशय लोकप्रिय होत्या त्यांनी पत्रकारिता व पुस्तक लेखनही केले. ‘मी नास्तिक का आहे?’,हे त्यांचे लोकप्रिय पुस्तक आजही भारताला प्रेरणा देताना दिसते. त्यांच्यावर कार्ल मार्क्स, ब्लादिमीर लेनिन,बकुनीन समाजवाद व कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव होता.त्यांच्या कृती कार्यक्रमातून अनेक क्रांतिकारक व समाजसुधारक जन्माला आले. आज देश संक्रमण काळातून जात असताना खऱ्या अर्थाने क्रांतिकारक भगतसिंग यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रा. डॉ.प्रभाकर यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.अनिल टिके म्हणाले, ऐतिहासिक लढे व गडकोट किल्ले जोपासून ठेवले पाहिजेत.यावेळी त्यांनी ऐतिहासिक गडकोट किल्ल्यांची सूक्ष्म माहिती विद्यार्थ्यांना करून देताना शिवकाळ व स्वातंत्र्य काळ उभा केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अंकुश खोब्रागडे यांनी केले.कार्यक्रमाला डॉ.योगिता मठपती,प्रा.रेश्मा निकम,प्रा. अनुप गोडसे इ.सह राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. शेवटी प्रा.फिरोज शेख यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!