फलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटर’चीच विनोदी सत्ता? विनोद नावाच्या कर्मचाऱ्याचा ‘साहेबी’ थाट चर्चेत!



फलटण (प्रतिनिधी):
सरकारी खात्यात बदलीचे नियम आणि शिस्त असते, मात्र फलटण नगरपालिकेत एक वेगळाच ‘रुल’ पाहायला मिळत आहे. २००३ मध्ये पंप ऑपरेटर म्हणून रुजू झालेला विनोदी नव्हे तर विनोद नावाचा कर्मचारी गेल्या २३ वर्षांपासून एकाच खुर्चीला चिकटून बसला असून, सध्या त्याच्या कामापेक्षा त्याच्या ‘रूबाबा’चीच चर्चा फलटण शहरात रंगली आहे. हा कर्मचारी नेमका नगरपालिकेचा सेवक आहे की मालक? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
सामान्यतः शासकीय कर्मचाऱ्यांची ठराविक काळानंतर बदली होते, मात्र या महाशयांना २३ वर्षात कोणीही हलवू शकले नाही. केवळ १० वी पास आणि ITI चे शिक्षण घेतलेला हा ऑपरेटर आज फलटण नगरपालिकेत एखाद्या मोठ्या ‘साहेबा’च्या थाटात वावरताना दिसतो. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात ऑपरेटरचे काम सोडून, साहेबांच्या केबिनमध्ये बसणे आणि राजकीय नेत्यांची ‘हुजरेगिरी’ करण्यातच या कर्मचाऱ्याचा जास्त वेळ जात असल्याचा आरोप होत आहे.

नगरपालिकेत अनेक उच्चशिक्षित आणि MPSC देऊन आलेले अधिकारी संयमाने वागतात, मात्र या कर्मचाऱ्याचा दरारा पाहून नागरिक चक्रावून जातात. “साहेबांचा साहेब” असल्यासारखा त्याचा वावर पाहून, हा कर्मचारी नेमका कामासाठी आहे की मध्यस्थी (दलाली) करण्यासाठी? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजकीय वरदहस्त असल्यानेच या कर्मचाऱ्याला एवढी वर्षे एकाच ठिकाणी अभय मिळाले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

” लोक कामासाठी गेल्यावर अधिकारी ऐकून घेतात, पण हा ऑपरेटर मात्र लोकांनाच शिस्त शिकवतो. नगरपालिकेचा पगार घेऊन नेत्यांची चाकरी करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची चौकशी कधी होणार ? “

  राजकीय नेत्यांच्या जवळ राहून प्रशासनावर तर नागरिकांच्या वर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
मूळ काम सोडून इतर कामांमध्येच जास्त रस.
आता फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी या ‘अजब’ कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार आणि त्याची वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेली ‘सत्ता’ मोडीत काढणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!