माता रमाई नगर येथे ‘संविधान अमृत महोत्सव’ उत्साहात संपन्न; सम्राट ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक : सांगवी …..!

फलटण : सांगवी प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि ‘संविधान अमृत महोत्सव’ माता रमाई नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वैचारिक प्रबोधनासोबतच सामाजिक बांधीलकी जपणारे विविध उपक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन NDMJ चे राज्य सचिव आणि फलटण उपविभागीय दक्षता समितीचे केंद्रीय नामनिर्देशित सदस्य मा. वैभवजी गीते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योतिताई गौतम मोरे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. भुजबळ साहेब आणि विशेष सरकारी वकील अँड. अमोल सोनवणे यांची सन्माननीय उपस्थिती होती. याप्रसंगी सांगवी गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख व्याख्यात्या कु. नम्रताताई पोंदकुले यांनी आपल्या पहाडी आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्षावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. उद्घाटक वैभवजी गीते यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत संविधानाचे महत्त्व विशद केले. तसेच पोलीस निरीक्षक भुजबळ साहेब यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन NDMJ संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष तथा सम्राट ग्रुपचे पदाधिकारी जय माने यांनी केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा मांडला. सम्राट ग्रुपच्या वतीने माता रमाई नगर येथे सुरू करण्यात आलेल्या ‘पाणपोई’चे सर्व मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्राट ग्रुपने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सम्राट ग्रुपचे अध्यक्ष संजय बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.



