पश्चिम सीमांत सातारा जिल्ह्याच्या भागातील लोकांनो ‘माकडताप’ (Kyasanur Forest Disease – KFD) प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत डायबिटीस तज्ञ डाॅ विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांची तातडीची विनंती.

सातारा जिल्ह्याच्या पंचायत राज व महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी क्यासनूर वन क्षेत्रात आढळणारा माकडताप आजार महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता धूसर होती कारण भौगोलिक विविधता आणि इतर कारणांमुळे जरी प्रसाराचा पुर्व इतिहास नसला तरीही गेल्या ४ वर्षापासून हा आजार आपल्या कोकण विभागात डोके काढू पाहत आहे.
सातारा जिल्ह्याची पश्चिम सीमा ही कोकण भवताली ९७ किलोमीटर असून पाटण,जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगलात मोडतो.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या भागात राहणारे शेतकरी तसेच निसर्ग पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना ‘माकडताप’ (KFD) या जीवघेण्या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याने सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आपल्या जिल्ह्यातही हा आजार पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. गोचीडांमुळे पसरणारा हा आजार प्राणघातक ठरू शकतो याची मी एक सजग नागरिक या नात्याने गंभीरपणे जाणीव करून देत आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण तातडीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वस्तुनिष्ठ आराखडा तयार करावा आणि भविष्यातील जिल्ह्यात होणारा पादुर्भाव कसा रोखता येईल याची जिल्हा आरोग्य विभागातर्फे सीमाभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीकरीता वेळीच उपाययोजना कराव्यात.
माकडताप हा एक ‘सायलेंट किलर’ असून याची लक्षणे सुरुवातीला सामान्य तापासारखी वाटू शकतात. मात्र यावर वेळेत उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. पावसाळ्यात गोचीडांची वाढ वेगाने होते आणि वनक्षेत्रात किंवा शेतात काम करणाऱ्या तसेच निसर्ग पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गोचीड चावण्याचा किंवा आजारी/मृत माकडांच्या संपर्कात येण्याचा धोका असतो. यामुळेच हा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो.
खालीलप्रमाणे काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची विनंती आहे:
* जनजागृती अभियान (Awareness Campaign):
* ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत विशेषतः वनक्षेत्रांजवळ असलेल्या गावांमध्ये, माकडतापाची लक्षणे (तीव्र ताप, असह्य डोकेदुखी, अंगदुखी आणि रक्तस्राव) आणि त्याचे धोके याबद्दल व्यापक जनजागृती अभियान राबवावे.
* यासाठी स्थानिक आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा.
* पोस्टर, भित्तीपत्रके, स्थानिक केबल वाहिन्या आणि समाजमाध्यमांद्वारे माहितीचा प्रसार करावा.
* आरोग्य विभागाला सूचना व प्रशिक्षण
* जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs), ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना माकडतापाच्या लक्षणांची ओळख, तातडीचे उपचार आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
* गरज पडल्यास आवश्यक औषधांचा आणि उपकरणांचा साठा सुनिश्चित करावा.
* प्रतिबंधात्मक उपायांवर भर
* नागरिकांना शरीर पूर्णपणे झाकणारे लांब बाह्यांचे कपडे (फुल स्लीव्हज) वापरण्यास प्रोत्साहित करावे, विशेषतः वनक्षेत्रात जाताना.
* गोचीडांना दूर ठेवण्यासाठी कीटकनाशक स्प्रेचा वापर करण्याबद्दल माहिती द्यावी.
* मृत किंवा आजारी माकडांच्या थेट संपर्कात न येण्याबद्दल आणि अशा घटनांची माहिती तात्काळ वन विभाग किंवा आरोग्य विभागाला देण्याबाबत नागरिकांना सूचित करावे.
* घरी परतल्यावर कपडे स्वच्छ धुऊन आणि शरीराची तपासणी करून गोचीड चिकटले नसल्याची खात्री करून घेण्यास प्रवृत्त करावे.
* गावे आणि परिसराची स्वच्छता राखण्यावर भर द्यावा, जेणेकरून गोचीडांना वाढण्याची संधी मिळणार नाही.
* तातडीच्या उपचारांसाठी मार्गदर्शन
* कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास, एक क्षणही वाया न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्यास नागरिकांना आवाहन करावे. आरोग्य सेवा तत्पर ठेवण्याबाबत आरोग्य विभागाला सूचित करावे.
सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून आपण या गंभीर विषयाची नोंद घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तातडीने योग्य पावले उचलाल अशी मला खात्री आहे. आपल्या एकजुटीने आणि प्रयत्नांनी आपण आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून नक्कीच वाचवू शकू.
आपला नम्र,
डॉ. विश्वनाथ शालन हिरानाथ चव्हाण
कन्सल्टंट फिजिशियन
(मधुमेह, रक्तदाब, थायरॉयड तज्ज्ञ)
MBBS MD MEDICINE, Dip Echocardiography
संपर्क: ९३५९७२७१३५