दालवडी ग्रामपंचायती मधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास तक्रारदाराचा आंदोलनाचा इशारा



फलटण, प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, तत्कालीन ग्रामसेवक विष्णुपंत खोमणे, त्यानंतरचे ग्रामसेवक नंदकुमार ओव्हाळ तसेच शिपाई नारायण ननावरे व ज्ञानदेव बनकर यांच्याविरोधात चौकशी सुरू असल्याची माहिती तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी दिली आहे.

तक्रारीनुसार, सन २०१९ ते जून २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या कर वसुली आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर करांची वसुली करूनही संबंधित रक्कम ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदीत अथवा बँक खात्यात जमा न झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

तसेच डुप्लिकेट पावती पुस्तके वापरून कर वसुली करण्यात आल्याचा, विविध विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तसेच अनेक ग्रामस्थांकडे अशा पावत्या उपलब्ध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांतील सर्व आर्थिक नोंदी, बँक व्यवहार, पावती पुस्तके आणि विकासकामांची कागदपत्रे यांची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, शिपाई नारायण ननावरे यांनी काही रक्कम घेतल्याची कथित कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाला झालेल्या कथित आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, तक्रारदारांनी आणखी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, शिपाई नारायण ननावरे व ज्ञानदेव बनकर यांनी तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे यांच्या संगनमताने कथितपणे आधारकार्डातील जन्मतारखांमध्ये बदल करून सेवा मुदत वाढवून घेतली. निवृत्तीनंतरही शिपाई पदासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेत शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होणे अपेक्षित असतानाही काही अधिकारी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबत आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून चौकशीला गती न दिल्यास ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!