* धुमाळवाडी दरोडा प्रकरणातील मोक्क्याचा फरार गुन्हेगार जेरबंद फलटण ग्रामीण पोलीस ठाणे डी.बी. पथकाचे यश…..!

फलटण (ता. ०५ ऑक्टोबर)
धुमाळवाडी येथील दरोड्यासह मागील चार वर्षांपासून मोक्क्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाच्या अचूक टेहळणी व शिताफीने अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिसांना मोठे यश लाभले आहे.
दि. ०८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा परिसरात १० जणांच्या टोळीने पर्यटकांवर दरोडा टाकला होता. महिला पर्यटकांना लक्ष्य करत लाकडी दांडके व लोखंडी सु-यांचा धाक दाखवत गळ्यातील दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ असा एकूण ₹५४,५००/- किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ५१०/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सोमेश्वर जायपत्रे हे करीत होते.
या गुन्ह्यातील आरोपी रणजित कैलास भंडलकर आणि तानाजी नाथाबा लोखंडे (दोघे रा. खामगाव, ता. फलटण) हे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार होते. आरोपी रणजित भंडलकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, दुखापत, महिला अत्याचार असे तब्बल आठ गुन्हे दाखल असून, तो पोलीसांना चकवण्यात पटाईत होता. याच आरोपीवर मोक्क्याचा गुन्हा दाखल असून तो गेली चार वर्षे फरार होता.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. वैशाली कडुकर यांनी फरारी आरोपींवर विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांनी विशेष पथक तयार केले.
दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सांगवी (ता. फलटण) येथे आरोपी रणजित भंडलकर व तानाजी लोखंडे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला.
पोलीस उपनिरीक्षक बदने, तसेच अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हणमंत दडस, कल्पेश काशिद, तानाजी ढोले, गणेश ठोंबरे आणि अक्षय खाडे यांच्या पथकाने शिताफीने दोघांनाही अटक करून पोलीस ठाण्यात आणले.
या अचूक व नियोजनबद्ध कारवाईबद्दल फलटण ग्रामीण डी.बी. पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.