“फलटणमधील पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी”? ग्राहकाच्या तक्रारीने खळबळ….!!!



फलटण मधील इंधन गुणवत्तेबाबत चौकशीची मागणी?

फलटण शहरातील पुणे पंढरपूर रोड येथील इंडियन ऑईल पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जात असल्याचा गंभीर आरोप एका ग्राहकाने केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये इंधनाच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, संबंधित प्रकरणाची  चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने आपल्या वाहनात सुमारे सहा लिटर पेट्रोल भरले होते. मात्र पेट्रोल भरल्यानंतरही वाहन सुरू होत नसल्याने त्याला संशय आला. त्यानंतर वाहनातील इंधन काढून बाटल्यांमध्ये भरून तपासणी करण्यात आली. यावेळी सहा लिटर इंधनामधून अंदाजे दोन बाटल्या पाणी आणि चार बाटल्या पेट्रोल आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे.
या घटनेची माहिती परिसरात पसरताच वाहनधारकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण असणे ही नियमित प्रक्रिया असली तरी इंधनामध्ये पाण्याचे प्रमाण कसे आले, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही नागरिकांनी संबंधित इंधन नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी केली आहे.दरम्यान, सध्या भारतात E20 पेट्रोल (20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल) टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. ग्राहकांना कोणते इंधन भरले जात आहे याची स्पष्ट माहिती मिळावी यासाठी पेट्रोल पंपांवरील इंधन डिस्पेंसरवर किंवा त्याच्या जवळ E20, E15, E12 अशा प्रकारचे फलक किंवा स्टिकर्स लावणे अपेक्षित असते.
या फलकांवर सामान्यतः इंधनामधील इथेनॉलचे प्रमाण, ते कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी योग्य आहे तसेच वाहन उत्पादकांच्या सूचनांचे पालन करण्याबाबतची माहिती नमूद केलेली असते. मात्र फलटणमधील अनेक पेट्रोल पंपांवर अशी माहिती स्पष्टपणे प्रदर्शित होत नसल्याची तक्रार काही वाहनधारकांनी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपण भरत असलेल्या इंधनाचे स्वरूप आणि त्यातील इथेनॉलचे प्रमाण समजण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, जर एखाद्या पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री होत असेल आणि त्याबाबतची माहिती ग्राहकांना दिसत नसेल, तर ग्राहकांनी संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडे चौकशी करावी किंवा संबंधित तेल कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार नोंदवावी, असेही जाणकारांकडून सांगितले जात आहे.विशेष म्हणजे, इंधन गुणवत्तेच्या प्रश्नासोबतच ग्राहक सुविधांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमांनुसार पेट्रोल पंपांवर प्रथमोपचार पेटी, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनांसाठी मोफत हवा, तक्रार नोंदवही तसेच इंधनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित पेट्रोल पंपावर या सुविधांची उपलब्धता आणि इंधन गुणवत्तेचे निकष पाळले जात आहेत का, याबाबत प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!