भीमसूर्याला बळ देणारी सावली : त्यागमूर्ती माता रमाई

फलटण :दि. 7 फेब्रु. 2026
( 7 फेब्रुवारी 2026 जयंती विशेष लेख )
इतिहास महान पुरुषांची नावे मोठ्या अक्षरांनी लिहितो; पण त्या महानतेच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांचे किंबहुना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यागमय जीवन जगणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य अनेकदा सावलीत राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, संघर्ष आणि क्रांती यांचा पाया ज्या मायेवर, संयमावर आणि त्यागावर उभा राहिला ती सावली म्हणजे त्यागमूर्ती भीम सूर्याची सावली माता रमाई.
इतिहासाच्या पानांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव क्रांती, विद्रोह आणि मुक्तीचे प्रतीक म्हणून कोरले गेले आहे. पण त्या क्रांतीच्या वाटेवर अखंड सावलीसारखी उभी राहिलेली, दुःख गिळून ध्येय जपणारी, त्याग आणि मायेची मूर्त प्रतिमा म्हणजे माता रमाई आंबेडकर. रमाईंचे जीवन म्हणजे एका स्त्रीचे आयुष्य नव्हे, तर एका युगाच्या जडणघडणीतील मूक पण निर्णायक भूमिका होय.
बालपण : गरिबी, दुःख आणि जबाबदारीची सुरुवात
७ फेब्रुवारी १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद या लहानशा गावात रमाईंचा जन्म झाला. वडील भीकू धोत्रे हे कष्टकरी मजूर होते. घरात धार्मिक संस्कार होते; पण रोजच्या जगण्यासाठीची झुंज अधिक तीव्र होती. रमाई लहान असतानाच आई रुक्मिणीचे निधन झाले. आईच्या मायेपासून वंचित झालेल्या रमाईवर अल्पवयातच घराची जबाबदारी आली.
आईपाठोपाठ वडीलही टी.बी.सारख्या आजाराने गेले. या दोन आघातांनी रमाई पूर्णपणे पोरकी झाली. मृत्यू, दारिद्र्य आणि संघर्ष यांचे वास्तव तिने बालपणीच अनुभवल्यामुळे तिच्या स्वभावात सहनशीलता, गंभीरपणा आणि त्याग रुजला.
बालविवाह आणि अकाली संपलेले बालपण
तत्कालीन सामाजिक रूढींनुसार रमाईंचा विवाह अत्यंत लहान वयात भीमराव आंबेडकरांशी झाला. शिक्षण, स्वप्ने, इच्छा या सर्व गोष्टी बालविवाहात गुदमरल्या. संसारात पाऊल टाकताच गरिबी, सामाजिक उपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचा भार तिच्या खांद्यावर पडला. पण तिने तक्रार केली नाही. परिस्थिती स्वीकारून तिने संसार सावरला.
शिक्षणासाठी संघर्ष आणि रमाईंचा त्याग
भीमरावांना शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे, हे उमगले होते. या ध्येयासाठी रमाईने स्वतःच्या आयुष्याचे सर्व सुख बाजूला ठेवले. १९१२ साली यशवंतचा जन्म झाला हा रमाईसाठी आशेचा किरण होता.
१९१३ मध्ये रामजी सुभेदारांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातच बाबासाहेबांना अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. पतीला निरोप देताना रमाईचे हृदय भरून आले होते; पण तिने अश्रूंना आवर घातला. कारण तिला माहीत होते हा प्रवास एका कुटुंबासाठी नव्हे, तर एका समाजाच्या भवितव्याकरिता आहे.
पती परदेशात, रमाई एकटी आणि दुःखांची मालिका
१९१३ ते १९२३ हा काळ रमाईच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ ठरला. बाबासाहेब परदेशात असताना संसाराची, मुलांची आणि आजारी नातेवाईकांची जबाबदारी एकटीवर आली.
या काळात रमेश, इंदू आणि गंगाधर या मुलांचे अकाली निधन झाले. उपासमार, औषधोपचारांचा अभाव, आजारपण या साऱ्यांचा सामना रमाईने एकटीने केला. तरीही बाबासाहेबांना पत्रांतून कधीही परिस्थितीची कल्पना दिली नाही. “आम्ही खुशाल आहोत” असे लिहून तिने त्यांचे मन अभ्यासात गुंतवून ठेवले. हा त्याग इतिहासात दुर्मीळ आहे.
बॅरिस्टर बाबासाहेब आणि रमाईचा स्वाभिमान
१९२३ साली बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतात परतले. त्या वेळी रमाईकडे नेसण्यास नीट साडीही नव्हती. तरीही तिने जरीचा फेटा नेसून, साधेपणात स्वाभिमान जपत पतीचे स्वागत केले. गरिबी असूनही आत्मसन्मान कसा जपायचा, हे रमाईंनी आपल्या वागण्यातून दाखवले.
*सामाजिक संघर्ष आणि रमाईची आईसारखी भूमिका*
महाड चवदार तळे सत्याग्रह, कळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषद—या प्रत्येक टप्प्यावर बाबासाहेब समाजासाठी लढत होते, तर रमाई त्यांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या. सत्याग्रह यशस्वी झाल्याची बातमी येईपर्यंत त्या अन्नही घेत नसत.
धारवाड येथे उपाशी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून अन्नाची व्यवस्था करणारी रमाई केवळ पत्नी नव्हे, तर समाजमातेची भूमिका बजावत होती.
श्रद्धा ते विवेक : वैचारिक परिवर्तन
बालपणापासून रमाई धार्मिक होत्या. पंढरपूर वारी, उपास-तपास यावर त्यांचा विश्वास होता. पण बाबासाहेबांनी तिला समतेचा, विवेकाचा मार्ग समजावून सांगितला. “जिथे माणसाला प्रवेश नाही, त्या देवाचे दर्शन निरर्थक आहे” हे विचार रमाईंनी स्वीकारले. श्रद्धेऐवजी मानवतेला महत्त्व देण्याचा हा तिच्या जीवनातील मोठा वैचारिक टप्पा होता.
राजगृह आणि रमाईची शांत छाया
दादरच्या हिंद कॉलनीतील ‘राजगृह’ हे बाबासाहेबांचे विचारकेंद्र बनले. गृहप्रवेशाच्या दिवशी रमाईंनी सर्व महिलांना सन्मानाने बोलावले, हळदीकुंकू केले आणि “माझं मूळ नाव भागीरथी आहे, आज ते सार्थ झालं” असे भावूक शब्द बोलल्या. त्या स्त्रियांच्या मनात रमाई म्हणजे आईच होती.
अंतिम क्षण : त्यागाचा परमोच्च बिंदू
आयुष्याच्या शेवटच्या काळात रमाईंची प्रकृती ढासळली. औषधोपचार सुरू असतानाही तिला मृत्यू जवळ दिसत होता. बाबासाहेब आले तेव्हा तिने शांतपणे सांगितले “आता उपचार नकोत.”
पती, पुत्र यशवंत आणि समाजकार्य यांचीच चिंता करत तिने शेवटचा श्वास घेतला. साहेबांच्या समक्ष मरण येणे हेच आपले भाग्य मानणारी रमाई, त्यागाची सर्वोच्च सीमा गाठून गेली.
माता रमाई आंबेडकर म्हणजे इतिहासातील एक मूक क्रांती.
त्यांच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचा संघर्ष अपूर्ण राहिला असता. रमाई म्हणजे भीमसूर्याची सावली जी स्वतः दिसत नाही, पण सूर्याला उभे राहण्याचे बळ देते.
त्यांची जयंती म्हणजे केवळ स्मरण नव्हे,
ती त्याग, संयम, स्त्रीशक्ती आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा आहे.
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन!!!!!
आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा (पूर्व)



